Digi Marathi

भरा केवळ २९९ रुपये आणि मिळवा १० लाखांचा विमा

Post Office : आजच्या काळात विम्याचे (Insurance) महत्त्व अनेक पटींनी वाढले आहे. अनिश्चिततेच्या या काळात कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी आधीपासूनच तयार राहणं आवश्यक आहे. आरोग्य विमा पॉलिसीचा प्रीमियम वयानुसार बदलतो. महागडा विमा घेतला तर त्याचा हप्ताही महाग असतो. अशा परिस्थितीत अनेक लोक आरोग्य विमा काढण्यास टाळाटाळ करतात. हे लक्षात घेऊन पोस्ट खात्यानं एक सामूहिक विमा संरक्षण योजना (Group insurance cover plan) आणली आहे.

या विम्याची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे जर तुम्ही कोणत्याही प्रकारच्या अपघातामुळे रुग्णालयात दाखल झालात तर त्याचा खर्चही तुम्हाला मिळतो. यामध्ये, तुम्हाला उपचारादरम्यान 60,000 रुपयांपर्यंतचा IPD खर्च आणि OPD मध्ये 30,000 रुपयांपर्यंतचा क्लेम मिळेल. या विमा योजनेअंतर्गत, तुम्हाला 299 आणि 399 सारख्या अत्यंत कमी प्रीमियमसह 10 लाख रुपयांपर्यंतचे संरक्षण दिले जाते.

काय आहे हा प्लॅन?

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (India Post Payments Bank) आणि टाटा एआयजी (Tata AIG) यांच्यात एक करार करण्यात आला आहे. या करारानुसार 18 ते 65 वयोगटातील व्यक्ती या अपघात विमा संरक्षणाचा लाभ घेऊ शकतात. दोन्ही प्रकारच्या विमा संरक्षणामध्ये अपघातामुळे मृत्यू, कायमस्वरूपी किंवा अंशतः अपंगत्व, अर्धांगवायू यासाठी 10 लाख रुपयांचे संरक्षण मिळेल. त्याच 1 वर्षाच्या समाप्तीनंतर, पुढील वर्षी या विम्याचे नूतनीकरण देखील करावे लागेल. यासाठी विमा घेणाऱ्याचे इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत खाते असणे अत्यंत आवश्यक आहे.

काय आहेत अन्य फायदे?

या प्लॅन अंतर्गत, काही इतर फायदे देखील 399 रुपयांच्या प्रीमियममध्ये उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ, दोन मुलांच्या शिक्षणासाठी 1 लाख रूपये, रूग्णालयात असल्यास 10 दिवसांकरीता प्रतिदिन 1000 रुपये, दुसर्‍या शहरात राहणाऱ्या कुटुंबाच्या वाहतूकीच्या खर्चासाठी 25,000 रुपयांपर्यंतचा खर्च, मृत्यू झाल्यास अंत्यसंस्कारासाठी 5,000 रुपयांपर्यंतचा खर्च दिला जातो. या विम्याचा लाभ घेण्यासाठी तुम्ही जवळच्या पोस्ट ऑफिसशी संपर्क साधू शकता.

Exit mobile version