उष्णता व उष्माघातापासुन जनावरांचा बचाव करण्यासाठी घ्यायची काळजी.
सध्या भारतीय तसेच अशिया खंडात उष्णतेची लाट असल्यामुळे दिवसेंदिवस रोजच्या तापमाणात वाढ होत आहे. त्यातल्या त्यात आपल्या महाराष्ट्रात तर तापमानात कमालीची वाढ बघायला मिळत आहे. या वाढत्या उष्णतेचा महाराष्ट्रातील जनतेसह आपल्या शेतकऱ्याच्या पशुधनालाही त्रास होत आहे. त्यात वाढते पाण्याचे दुर्भिक्ष आणि ग्रामीण भागात वाढत असलेली चारा टंचाई यामुळे पशुधन पालक तसेच शेतकरी वर्गात कमालीची अशांतता आहे. या वाढत्या उष्णते पासुन प्राण्यांच्या बचावासाठी पशुसंवर्धन विभागाने काही उपाययोजना सुचवल्या आहेत.
उष्माघातामुळे पाळीव प्राण्यांच्या शरीरावर विविध परिणाम होऊन ते आजारी पडुन दगावण्याची शक्यता असते. राज्यात पारा चाळीशी पार करत असुन राज्यांतील विविध भागात उष्णतेचे प्रमाण वाढत आहे. यामुळे लहान वासरे,करडे,काळ्या किंवा गडद रंगाचे प्राणी विविध आजाराने ग्रस्त आहेत. तसेच दुभती जनावरे,कुक्कुट पालनातील पक्षांना उष्माघाताचा जास्त धोका निर्माण झाला आहे.
त्यामुळे अशी आजारी असलेली जनावरे ओळखुन त्यांची योग्य ती आरोग्य तपासणी करुन त्यांची काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे. अशा आजारी जनावरांची लक्षणे ही धाप लागणे श्वासोच्छवासाची गती वाढणे,नाकपुड्या कोरड्या पडणे,लाळ गळणे ही लक्षणे दिसताच त्वरीत तपासणी करुन योग्य ते वैद्यकीय उपचार देणे महत्चाचे असते.
उष्माघातापासुन जनावरांचा बचाव करण्यासाठी पशुधनास सावलीत किंवा निवाऱ्यात थंड जागेत ठेवावे. शक्य असल्यास फॅन लावावेत, थंड पाणी पिण्यासाठी पुरवावे, एका जागेत पशुधनाची दाटी करू नये, गोठ्यातील जनावरांची घनता कमी करावी.
शेतीविषयक व इतर कामासाठी वापरण्यात येणाऱ्या पशुधनास उन्हाच्या वेळी कामास लावू नये. कुक्कुट पक्ष्यांसाठी पक्षीगृहाच्या शेडवर गवताचे आच्छादन करावे, पक्षिगृहाच्या जाळ्यांना पडदे लावून त्यावर पाणी शिंपडावे. तसेच पक्षिगृहात भरपूर खेळती हवा राहील याची दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे