2 जुलै 2023 रोजी झालेल्या शपथीविधी विषयी अजितदादा यांनी बोलायला हवं. “राष्ट्रवादीला कुठली पदं मिळणार, लोकसभेला किती जागा मिळणार याविषयी शरद पवार यांच्यासोबत चर्चा झाल्या होत्या”, असा मोठा गौप्यस्फोट सुनील शेळके यांनी केला.

राष्ट्रावादी काँग्रेस पक्षात जेव्हा फुट पडली तेव्हा पडद्यामागे नेमक्या काय-काय घडामोडी घडल्या होत्या, याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचे आमदार सुनील शेळके यांनी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्याबाबत मोठा दावा केला आहे.

 “शरद पवार यांनीच ग्रीन सिग्नल दिला, तुम्ही पुढे जा… मी माझा राजीनामा देतो. त्यानंतर शरद पवार यांना राजीनामा मागे का घ्यावा लागला? हे केवळ सुप्रिया सुळे सांगू शकतात. पवार कुटुंब टिकावं म्हणून आजही अजित पवार गप्प आहेत. याचा फायदा खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार आणि आमदार जितेंद्र आव्हाड घेत आहेत”, असं सुनील शेळके म्हणाले.

“शरद पवार काही बोलले तरी तो त्यांचा अधिकार आहे. त्यांच्या बोलण्याचं आम्हाला वाईट वाटत नाही. रोहित पवार, सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड हे शरद पवारांना बोलण्यास भाग पाडतात. शरद पवारांच्या मनात आमच्याबद्दल विष पेरण्याचं काम केलं आहे”, असा मोठा दावा सुनीळ शेळके यांनी केला.

“2 जुलै 2023 ला सकाळी देवगिरीवर गेलो आणि दुपारी शपथविधी झाला. यानंतर राष्ट्रवादीत फूट पडली. शरद पवार आणि अजित पवार वेगळे झाले. हे अवघ्या काही तासात झाले नाही, यामागे दोन महिन्यांचा प्लॅन होता. उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री छगन भुजबळ, खासदार सुनील तटकरे, खासदार प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांच्याशी चर्चा करून जो काही निर्णय घ्यायचा होता तो घेतला. या घडामोडींच्या सुप्रिया सुळे यादेखील साक्षीदार होत्या”, असं सुनील शेळके म्हणाले.

‘राष्ट्रवादीला कुठली पदं मिळणार याबाबत शरद पवारांसोबत चर्चा’

“अजित पवारांना विनाकारण व्हिलन केलं जातंय. साहेबांची अजित पवारांनी साथ सोडली याचा माहोल केला जातोय. अजित पवार यांनी स्पष्टपणे बोललं पाहिजे. 2 जुलै 2023 च्या शपथीविधी विषयी बोलायला हवं. राष्ट्रवादीला कुठली पदं मिळणार, लोकसभेला किती जागा मिळणार याविषयी शरद पवार यांच्यासोबत चर्चा झाल्या होत्या”, असा मोठा गौप्यस्फोट सुनील शेळके यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *